विधानसभा क्षेत्रात सामाजिक माध्यमाद्वारे प्रचार… कोणतेच बोर्ड नाही, रिक्षा गाडी नाही, कोणताही खर्च नाही फक्त ऑनलाईन प्रचार करत आहे…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
अपक्ष उमेदवार केतन पारखी हे वणी शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवाशी आहे. अतिशय तलख्ख बुद्धीचा हा तरुण असून ते बुद्धीतेजाने सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला आहे. इंजिनिअर होण्याकरिता कुठेही त्याने शिकवणी वर्ग लावले नाही. यु-ट्युबच्या माध्यमातून त्याने शैक्षणिक धडे घेतले. त्यांनी आपला पूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनेच पूर्ण केला. ते काही तरी वेगळं करण्याची इच्छा मणी बाळगतो. स्टार्टअप मीडियाचा ते पुरस्कर्ता आहे. त्यांनी वणी सिटी डॉट कॉम, सह्याद्री मीडिया सारखे अनेक सामाज माध्यम जनतेला आपल्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. अतिशय महत्वाकांक्षी असा हा तरुण आहे. त्यांनी हेल्पिंग हँड ग्रुप आणि ग्रीन वणी या स्वयंसेवी संस्थाही चालविल्या आहेत. गोरगरीब मुलांना मोफत कोचिंग दिली आहे. त्याच्या मार्गदर्शनात बरेच युवक उच्च शिक्षित बनून लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांवर लागले आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाने असामान्य काम केलं आहे. घरची परिस्थिती बेताची असतांनाही त्याने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. आज तो नागपूर येथे एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो आजही विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करतो. गरिबीतून पुढे आलेल्या या तरुणाला गोरगरिबांच्या हक्कांसाठी लोकप्रतिनिधी दाखवीत असलेली उदासीनता काळजाला लागली आहे. त्यामुळे त्याने थेट विधानसभा लढविण्याचाच निर्णय घेतला. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता राजकीय पायरी चढायचीच ही जिद्द त्याने उराशी बाळगली आहे. आणि यात यशस्वी होईपर्यंत तो विधानसभा लढत राहणार असल्याचा संकल्प त्याने केला आहे.

ऑनलाईन क्षेत्रात तो पारंगत असल्याने तो आपला प्रचारही ऑनलाईन पद्धतीनेच करत आहे. कार्यकर्त्यांचे लोंढे त्याच्या पाठीशी नाही. त्याच्या घराण्याचा राजकारणाशी दूरदूर पर्यंत संबंध नाही. कुठलंही राजकीय वलय नाही की पार्श्वभूमी नाही. कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा पाठिंबा देखील नाही. मात्र राजकारणाला व्यावसायिक रूप प्राप्त झाल्याची खंत त्याच्या मनाला रुतली आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी आपल्या पिढ्या कशा सुखी होतील याचा जास्त विचार करतात. त्यामुळे सर्वसामान्य जनता आहे तिथेच ताटकळत पडली आहे.

लोकांच्या मतावर निवडून येणारे राजकारणी आपल्या स्वार्थासाठी राजकारणाचा वापर करून घेतात. जनता आपल्या भरवशाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्याची निवड करते तो आपल्या फायद्यासाठी कोणत्याही पक्षाशी हात मिळवणी करतो. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाही. आणि त्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ येते. त्यामुळे नव्या दमाच्या निस्वार्थी युवकांना राजकारणात येण्याची गरज निर्माण झाल्याचे केतन पारखी या तरुण उमेदवाराचे म्हणणे आहे. गावागावात फिरून किंवा बॅनर पोस्टर लावून तो प्रचार करणार नाही. केवळ समाज माध्यमातून तो लोकांपर्यंत पोहचेल. तो आपला प्रचार पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करणार आहे. त्याच त्या नेत्यांच्या भोवती फिरणारं राजकारण दूर करण्याकरिता नव्या दमाच्या तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे असा मानसही त्याने व्यक्त केला आहे. वणी येथील रहिवाशी असलेल्या केतन पारखी याने वणी तसेच नागपूर दक्षिण मतदार संघात निवडणूक लढविण्याचं धाडस केलं आहे. आता जनतेची त्याला किती पसंती मिळते. हे आपल्याला निकालाच्या दिवशी समजणार आहे.




