राग रागेश्रीच्या आलाप-जोड-झाल्याने रंगली संगीत मैफल; भक्तिगीतांनी वातावरण झाले कृष्णमय
वणी : श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती, वणीच्या वतीने आयोजित ‘सतार वादन फ्युजन व भक्ती संध्या’ या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गरिमा व रिधिमा शेजाळ या भगिनींच्या सुरेल सतार वादनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमात राग रागेश्रीमध्ये आलाप, जोड व झाला सादर करण्यात आला. त्यानंतर मध्यलय व द्रुतलयीत तीनतालात सतार वादन करण्यात आले. सतारीच्या मधुर स्वरांनी सभागृहात शास्त्रीय संगीताची अनुभूती निर्माण केली.
यानंतर राग खमाजमधील धून, तसेच ‘बडा नटखट है’, ‘गोविंद बोलो’ आणि ‘अच्युतम केशवम’ या गीतांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. शास्त्रीय संगीत आणि फ्युजनचा सुरेल संगम रसिकांना अनुभवायला मिळाला.
‘भक्ती संध्या’मध्ये सादर झालेल्या विविध भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय झाले. या संगीत मैफलीला तबला – अमोल बावणे, ढोलक – अभिलाष राजूरकर, अँक्टो पॅड – अक्षय करसे आणि कीबोर्ड – निखिल जिरकुंटवार यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन सागर मुने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जन्माष्टमी उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. कुणाल चोरडिया यांनी कलाकार व सहकाऱ्यांचा सत्कार करून गौरव केला. कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
शास्त्रीय संगीत, फ्युजन आणि भक्तिगीतांच्या सुरेल संगमाने जन्माष्टमी उत्सवाला सांगीतिक उंची प्राप्त झाली.
जन्माष्टमी उत्सवानिमित्त सतार वादनाने रसिक मंत्रमुग्ध
RELATED ARTICLES




