वणीत भाजपची लाट; विद्या खेमराज आत्राम नगराध्यक्षपदी विजयी
AM न्यूज वृत्तांकन, वणी
उबाठा गटाच्या संचिता नगराळेंना धक्का, भाजपची एकहाती सत्ता…. 18 नगरसेवकांसह निर्विवाद बहुमत, काँग्रेस-उबाठाची पिछेहाट…

वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज दिनांक 21 डिसेंबर 2025 ला जाहीर झाला असून, भारतीय जनता पक्षाने विरोधकांचा सुपडा साफ करत पुन्हा एकदा गड आपल्या ताब्यात ठेवला आहे. अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणार्या नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपच्या विद्या खेमराज आत्राम यांनी 15,377 भरघोस मते घेत दणदणीत विजय मिळविला. त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार संचिता नगराळे 10,585 यांचा पराभव केला. नगराध्यक्षपदासह तब्बल 18 नगरसेवक निवडून आणत भाजपने वणी नगरपरिषदेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना (उबाठा) गटाच्या संचिता नगराळे या नगराध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या फेरीपासूनच विद्या आत्राम यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकत विकासाला कौल दिला आहे. 29 सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा भाजपने सहज पार केला. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाला 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली असून त्यांना केवळ 3 जागा मिळाल्या. दोन प्रभागांत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. निकालाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडून जल्लोष केला. भाजपची एकहाती सत्ता आल्याने आता शहरातील विकासाचा मार्ग मोकळा होईल आणि वणीचा खर्या अर्थाने कायापालट होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

विजयी शिलेदार:
भाजप (18): रिता महेश पहापळे 927, वैशाली विनोद वातिले 941, लक्ष्मण महादेव उरकुडे 870, अर्चना संजय पुनवटकर 1125, राकेश लक्ष्मण बुग्गेवार 959, सोनाली प्रशांत निमकर 1579, रितिक लक्ष्मण मामीडवार 1141, उषा नत्थू डुकरे 676, नितीन गोपाल धाबेकर 598 , प्रमिला मनोज चौधरी 761, आरती गिरीश वांढरे 1221 , अनिल लाभचंद चिंडालिया 1284, रेखा विलास कोवे 1185, लवली किशन लाल 710, पूजा रविंद्र रामगिरवार 821, मनोज कवडी सीडाम 648, मनीषा राजू गव्हाणे 1310, अर्चना शंकर झिलपे 1479.
शिवसेना उबाठा (6): अजय पांडुरंग धोबे 540, प्रणाली गणेश देऊळकर 970, अनिकेत अनिल बदखल 439, सुधीर रामदेव थेरे 519, किरण शंकर देरकर 1245, गुलाम रसूल रंगरेज 1513.
काँग्रेस (3): करुणा रवींद्र कांबळे 758, अलका मारोती मोवाडे 1193, सैफुर रहेमान1247.
अपक्ष (2): धनराज रमेश भोंगळे 685, अब्दुल हाफिज सत्तार 836.
पक्षीय बलाबल (एकूण जागा 29)
भारतीय जनता पक्ष: 18 (बहुमत)
शिवसेना (उबाठा): 06
काँग्रेस: 03
अपक्ष: 02
नगराध्यक्ष: भाजप (विद्या आत्राम)
विकासाचा मार्ग मोकळा
गेल्या काही वर्षांत वणी नगरपरिषदेत सत्तासंघर्षामुळे विकासाला खीळ बसली होती. मात्र, यावेळी मतदारांनी कोणत्याही आघाडीला किंवा खिचडी सरकारला संधी न देता भाजपच्या हाती स्पष्ट बहुमताची दोरी दिली आहे. नगराध्यक्ष आणि सभागृहातील बहुमत एकाच पक्षाचे असल्याने निर्णय घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे वणी शहराचा रखडलेला विकास आता ’टॉप गिअर’मध्ये धावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




