
वणी : प्रतिनिधी
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालर येथे विषारी द्रव्य प्राशन केल्याने गंभीर प्रकृती असलेल्या संदीप शंकर वरारकर (वय अंदाजे ४० वर्षे) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच २६ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास संदीप वरारकर यांनी शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी नागपूर येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविता आले नाही. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संदीप वरारकर यांच्या नावावर शेतजमीन नसल्याची माहिती असून, त्यांचे वडील शंकर दादात्री वरारकर यांच्या नावावर मौजा भालर येथील गट क्रमांक २४४ मध्ये १.२८ हेक्टर आर शेतजमीन आहे. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही.
त्यांच्या पश्चात पत्नी कविता आणि कुणाल (वय १८ वर्षे) व सुजल (वय १६ वर्षे) ही दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील सदस्याच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, भालर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





