Saturday, July 25, 2026
Google search engine
spot_imgspot_img

देरकर यांनी करोडोंचा भ्रष्टाचार केला : विश्वास नांदेकर

सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थानच्या जमीनीची परस्पर विल्हेवाट..! पत्रकार परिषदेतून आरोप

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरु जगन्नाथ महाराज यांच्या नावाने देवस्थानला दान दिलेल्या जमिनीचा संस्थेच्या सचिवांनी एका खाजगी कोळसा कंपनीसोबत संगनमत करुन परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे. जमीन विक्रीतून संस्थेचे सचिव संजय देरकर यांनी करोडोचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोपही विश्वास नांदेकर यांनी केला. रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर ला दुपारी शहरातील रवीनगर स्थित आपल्या राहत्या घरी आयोजित एका पत्रकार परिषदेत नांदेकर यांनी याबाबत केलेल्या तक्रारी, जमिनीच्या विक्रीचे दस्तावेज व इतर पुरावे पत्रकारांसमोर सादर केले.


पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सद्गुरु जगन्नाथ महाराजांचे परम भक्त कृष्णाजी मंदावार यांनी मौजा रुईकोट, तालुका – झरीजामणी (तत्कालीन मारेगाव तहसील) येथील आपल्या शेतजमीन पैकी गट क्रमांक 49/5 हा 2.02 हे.आर. भूखंड जगन्नाथ महाराज हयात असताना सन 1985 मध्ये त्यांना दान स्वरुप दिला. जगन्नाथ महाराज विदेही झाल्यानंतर सदर जमीन सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थान, वेगांव तह. वणी या संस्थेच्या ताब्यात आहे. वणी येथील संजय नीलकंठराव देरकर या संस्थेचे सचिव आहेत.


मुकुटबन, रुईकोट, अर्धवन, पांढरकवडा परिसरात खाजगी कोळसा खाणी अस्तित्वात आल्यानंतर परिसरात शेतजमिनीचे दर गगनाला भिडले. दरम्यान मंदावार कुटुंबीयांनी दान दिलेले भूखंड सोडून आपल्या ताब्यातील उर्वरित शेती खाजगी कोळसा कंपनी मे.बी.एस. इस्पात लिमिटेड या कंपनीला विक्री केली. जगन्नाथ महाराज देवस्थान समितीच्या ताब्यातील भूखंड गट क्रमांक 49/5 हा रस्ता लगत असल्याने कोळसा खाणीकडे जाण्यास रस्ता राहिला नाही. अश्या परिस्थितीत बी. एस. इस्पात कंपनीने सदर संस्थेच्या विश्वस्त मंडळींशी संपर्क साधला.


देवस्थान संस्थेच्या विश्वस्तांनी कोळसा कंपनीला सदर जमिनीवर कोळसा उत्खनन करण्याची परस्पर परवानगी दिली. त्यानंतर बी.एस. इस्पात लिमिटेड यांनी स्वतच्या मालकीच्या जमिनीला लागून असलेल्या संस्थेच्या 2.02 हे. आर. जमिनीची खरेदी न करता मागील 2 वर्षात तब्बल 50 कोटी रुपयांचा कोळसा देवस्थानचा जमिनीतून बेकायदेशीर उत्खनन केला. उत्खनन केलेल्या हजारो टन कोळशाचा पैसा संस्थेच्या खात्यात जमा न होता विश्वस्तांच्या खिशात गेल्याचा खळबळजनक आरोप विश्वास नांदेकर यांनी केला आहे.


जगन्नाथ महाराज देवस्थान संस्थेची जमिनीवर बेकायदेशीर कोळसा उत्खनन बाबतची तक्रार माथार्जून येथील सामाजिक कार्यकर्ता बंडू देवाळकर यांनी 3 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग, धर्मदाय आयुक्त आणि मुकुटबन पोलीस ठाण्यात केली.


त्यानंतर संस्थेचे सचिव संजय देरकर व बी.एस. इस्पात कंपनी यांनी धावपळ करून 17 ऑक्टोबर 2024 रोजी या जमिनीचे विक्रीपत्र केले. विशेष म्हणजे मालमत्ता विक्रीपत्र करुन देताना कोळसा कंपनी कडून संपूर्ण रक्कम मिळाली नाही. तर कंपनीने 2025 पर्यंतचे पोस्ट डेटेड चेक संस्थेला दिले आहे. कोट्यावधी रुपयांची मनी लाँड्रिंग प्रकरणी कंपनी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बी. एस. इस्पात लिमिटेडची चौकशी सुरु आहे. अशात कोट्यवधीची जमीन या कंपनीला उधारीमध्ये विकण्यात आल्याचे आरोप विश्वास नांदेकर यांनी पत्र परिषदेत केला.

बी.एस. इस्पात कंपनी ED च्या रडारवर..!

मुकुटबन येथे खाजगी कोळसा कंपनी मे. बी.एस. इस्पात लिमिटेड मध्ये सुरवातीपासून अनेक गैरप्रकार सुरु आहे. कोळशाचे अवैध उत्खनन व वाहतूक, तसेच परवानगी नसताना खुल्या बाजारात कोळसा विक्री प्रकरणी कंपनीची चौकशी सुरु आहे. तर आता कोळसा विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची मनी लाँड्रिंग प्रकरणी कंपनी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बी. एस. इस्पात लिमिटेडची चौकशी सुरु आहे.

12 सप्टेंबर 2024 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने तहसील कार्यालय झरीजामणी यांना पत्र देऊन बी.एस. इस्पात लिमिटेड यांचे मालकीचे मौजा रुड़कोट, तह. झरीजामणी येथील गट क्रमांक 46/1, 17/2, 49/1, 49/2, 49/3, 49/4, 19/2, 19/2 (अ) व 48/1 या शेत जमिनीचे विक्री, फेरफार, हस्तांतरण, गहाण, धारणाधिकार या सर्व बाबीवर प्रतिबंध लावला आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार झरीजामणी यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजी दुय्यम निबंधक झरीजामणी, मण्डल अधिकारी झरी व तलाठी रुईकोट यांना पत्र देऊन सदर जमिनीचे फेरफार व इतर बाबीवर बदल करण्यात येऊ नये, असे आदेश दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular