तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर…वीरांगना राणी अवंतीबाई तालुका क्रिडा संकुल सुविधांचे उद्घाटन
प्रतिनिधी : कविता पवार, नागपूर, 7875550308
क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रिडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल व जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरुपातील एक भक्कम क्रिडा संकुल मानकापूर येथे साकारले आहे. त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रिडांगणाची गुणवत्ता व सेवासुविधा असलेले क्रिडांगण आपण कोराडीला साकारुन दाखविले आहे. येथील परिपूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोराडी येथील तालुका क्रिडा संकुल सुविधांचे लोकार्पण व हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात ते बोलत होते. कोराडी येथील या तालुका क्रिडा संकुलाला वीरांगना राणी अवंतीबाई असे नामकरण या समारंभात करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रिडा उपसंचालक शेखर पाटील व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमृत काळातील आपण तिसरा स्वातंत्र्य उत्सव साजरा करीत आहोत. या देशातील गोरगरिब, प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींच्या विकासाची संकल्पना आपण स्वीकारली आहे. हा अमृत महोत्सव आपण अधिक भक्कमपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या भक्कम पायावर साजरा करीत आहोत. आपल्या शेजारचे देश लडखडत असतांना आपली संयमी प्रगती आणि वाटचाल आपल्या राज्य घटनेने दिलेल्या मौलिक मुल्यांमुळेच सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोराडी येथील वीरांगना राणी अवंतीबाई तालुका क्रिडा संकुलात बॉक्सींग, टेबल टेनीस, फेन्सींग, कुस्ती, जिम्नॉस्टिक, बॅलन्सींग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटीक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रकारच्या खेळाच्या सुविधा उपलब्ध आहेत.




