वणी मध्ये २२ ऑगस्ट ला राज ठाकरे यांचे आगमन : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा असल्याची चर्चा…
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे २२ ऑगस्ट ला वणी शहरात आगमन होणार आहे. हॉटेल जन्नत सेलिब्रेशन येथे सायं. ७.०० वाजता वणी विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जोरदार स्वागत करणार असल्याची माहिती पक्षनेते राजू उंबरकर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. वणी हा मनसेचा बालेकिल्ला असून हा किल्ला काबीज करण्याच्या दृष्टीने मनसेच्या हालचालींना वेग आला आहे.

दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका असून सकाळी 11 वाजता , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाराष्ट्र सैनिकांच्या वतीने स्वागत झाल्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवमुद्रा जनसंपर्क कार्यालय येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट देणार असून त्यानंतर वर्धा येथे रवाना होणार आहे.

वणी मतदारसंघ हा मनसेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. राज ठाकरे यांचा दौरा म्हणजे विधानसभेचा हा मतदारसंघ काबीज करण्याच्या अनुषंगाने केला जाणारा दौरा असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे या दौऱ्यात भेटी गाठी व्यतिरिक्त आणखी काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून देखील राज ठाकरे यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांची बैठक घेऊन येणाऱ्या निवडणुका विषयी काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वणी विधानसभा ही मनसे लढवणार असल्याचे चित्र आता जवळजवळ स्पष्ट होत आहे.





