प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व तालुका विधी सेवा समिती वणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पोक्सो या कायद्याविषयी जनजागृती कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले . सध्याची सामाजिक परिस्थिती बघता अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक हल्ले या परिस्थितीचा विचार करून लोकमान्य टिळक महाविद्यालयांमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून तालुका विधी सेवा समिती चे वरिष्ठ न्यायाधीश शहाजी द. भोसले उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात अनेक कायद्याविषयी माहिती दिली तसेच कायद्याचे उल्लंघन करणारे मानसिकरित्या विकृत असल्याचे सांगितले. समाजात सर शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करायची असेल तर कायद्याचं पालन करायलाच पाहिजे नागरिकांच आद्य कर्तव्य आहे. तरुणांमध्ये कायदेविषयक जनजागृती होणे गरजेचे आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून वाहतूक शाखा वणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सीता वाघमारे यांनी वाहतूकी च्या नियमांचे पालन करणे म्हणजे नागरिकांच्या जीवाची हमी होय , वाहतूक नियमानुसार लायसन नसणाऱ्या अल्पवयीन मुला मुलींना पालकांनी सुद्धा दुचाकी चालवण्याची सहमती देऊ नये असे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले.

प्रमुख वक्त्या तालुका विधी सेवा समितीच्या अधिवक्ता एस. जी. क्षीरसागर यांनी पोक्सो या कायद्याविषयी कायदे आणि होणारे गुन्हे या विषयावर माहिती दिली तसेच कौटुंबिक हिंसाचार ,लैंगिक अत्याचार, हुंडा प्रतिबंधक कायदा अशा अनेक विषयावर प्रकाश टाकला. दुसरे प्रमुख वक्ते तालुका विधी सेवा समितीचे अधिवक्ता धनंजय आसुटकर यांनी सुद्धा सोशल मीडिया आणि त्यावर होणारे गुन्हे तसेच अँटी रॅगिंग लॉ व त्याविषयी असणारे कायदे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायदेविषयक जनजागृती करण्याची महाविद्यालयात अत्यंत गरज आहे. तरुणांमध्ये कायद्याच्या ज्ञानाचा अभाव हेच गुन्हेगारीला प्रवृत्त करण्याचे एकमेव कारण आहे आणि म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन दिले .

या कायदेविषयक शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जूनगरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जूनगरी यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका विधी सेवा समितीचे अधिवक्ता एस. ए. नावडे यांनी केले या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने लोकमान्य टिळक महाविद्यालया च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.




