
उपजीविकेसाठी आपण विविध प्रयत्न करतच असतो पण या सर्व गोष्टी उप आहेत. त्यापलीकडे असते ती जीविका. त्या जीवीकेचे नेमक्या स्वरूपाचे दर्शन घडवून देत त्यासाठी मार्गदर्शन करणारे संतांचे साहित्य कधीच जुने होऊ शकत नाही. मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने मूल्य संपन्न आणि सकारात्मक करणाऱ्या संतांच्या जीवनात देखील अनेक संकटे आली पण आपल्या आयुष्यातील या अवहेलनेचा, अपमानाचा लवलेशही त्यांच्या साहित्यात उमटत नाही हे संतांचे आणि संत कवियत्रींचे खरे वैभव आहे, असामान्य असे श्रेष्ठत्व आहे ” असे विचार मुंबई येथील बेडेकर उद्योग समूहाच्या विद्यावाचस्पती सौ. अपर्णा अजित बेडेकर यांनी व्यक्त केले.

वणी येथील जैताई देवस्थानच्या शारदीय नवरात्रामध्ये पाच संत कवियत्रींच्या योगदानावर आधारित “तिनेच गगन झेलियले” या चिंतन पूर्ण सादरीकरणात त्या व्यक्त होत होत्या. प्रणिता पुंड आणि अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या योगी पावन मनाचा या गाण्याने कार्यक्रमाचा आरंभ झाला.
सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक करताना देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांचा आलेख सादर केला. अलका अणे यांनी वक्त्यांचा सत्कार केला.
आपल्या अत्यंत संयत, अभ्यासपूर्ण आणि प्रभावशाली निरूपणामध्ये डॉ. अपर्णा बेडेकर यांनी, चांगदेवांना आणि नामदेवांना देखील ज्ञान देणाऱ्या मुक्ताबाईच्या योगदानाचा गौरव करताना जर तिने ताटीचे अभंग रचत माऊलींना त्यांच्या संतत्वाची जाणीव करून दिली नसती तर कदाचित भविष्यात ज्ञानेश्वरी प्रगट झाली नसती असे म्हणत मुक्ताबाईंचे अलौकिकत्व अधोरेखित केले.
केलेल्या कामाचे मोल स्वीकारणारी मोलकरीण नव्हती तर दास्यत्व भक्ती करणारी दासी जनाबाई ही नामदेवांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चंदनवनाने सुगंधित झालेली दिव्य वेल होती. अशा शब्दात त्यांनी जनाबाईच्या दिव्यत्वाला वंदन केले.
२७ नक्षत्रांप्रमाणे केवळ २७ अभंग लिहून अजरामर झालेल्या कान्होपात्रेचे दर्शन घेतल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही हा तिचा अधिकार होता. याकडे त्यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले.
संपन्न घराण्यात जन्माला आली असूनही दुर्दैवाने वैधव्य आल्यावर, भागवत वाचू शकणारी, चार भाषांवर प्रभुत्व असणारी, २२ प्रकारची रामायण लिहून काढणारी, दहा-बारा ग्रंथांची ग्रंथकर्ती आणि चारशे वर्षांपूर्वीच्या काळात श्री समर्थांनी जिला मठाधिपती म्हणून गौरविले ती वेणाबाई म्हणजे स्त्री शक्तीचा अलौकिक जागर आहे असे म्हणत त्यांनी वेणाबाईंच्या वैशिष्ट्यपूर्णतेला नमन केले.
खऱ्या अर्थाने पहिली आत्मचरित्रकार असणारी, आपल्या स्वतःच्या १२ पूर्व जन्मांचा आणि त्यातील क्रम विकासाचा आलेख मांडणारी, वज्रसूची सारख्या ग्रंथावर भाष्य करणारी बहिणाबाई , प्रपंच परमार्थ चालवी प्रमाण ! तिनेच गगन झेलियले ! असा शब्दात शुद्ध वेदांत मांडू शकते असे म्हणत त्यांनी या पाचही संत कवियत्रींच्या विविध रचनांच्या आधारे त्यांच्या अलौकिकत्वाला श्रोत्यांच्या मनात हळुवारपणे रुजवले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यावाचस्पती प्रा स्वानंद गजानन पुंड यांनी या सर्वच कवियत्रींच्या जीवनात व्यावहारिक अर्थाने आलेल्या संकट, कष्ट किंवा अपमानाकडे न पाहता त्यांची महत्ता कळल्यानंतर समाजाने त्यांना दिलेल्या सन्मानालाच खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा गौरव म्हणतात हे विशेषत्वाने प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन देवस्थानचे सदस्य प्रा. चंद्रकांत अणे यांनी केले.




