प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी
वणी येथील जैताई देवस्थानच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण समाज सेवेसाठी देण्यात येणारा जैताई मातृगौरव पुरस्कार या शारदीय नवरात्र उत्सवातील अत्यंत भव्य आणि प्रसन्न समारंभात, श्रीपाद सेवा मंडळ पुणे येथील सद्गुरु परमपूज्य शिरीष दादा कवडे यांना गाणपत्य सांप्रदायाचे उपासक आणि प्रचारक विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड यांच्या हस्ते सादर प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर हरिभक्तिपरायण निकम महाराज, वेदमूर्ती अनिल रईच,जैताई देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार, सचिव मनुमहाराज तुगणायत, सदस्य आशुतोष शेवाळकर, किशोर साठे, चंद्रकांत अणे, तुषार नगरवाला, सामाजिक कार्यकर्ता संजय खाडे हे मान्यवर उपस्थित होते. प्रणिता पुंड, रेणुका अणे तथा अपर्णा देशपांडे यांनी सादर केलेल्या सरस्वती स्तवन आणि मातृगौरव गीताने कार्यक्रमाचा आरंभ झाला.

प्रास्ताविकामध्ये माधव सरपटवार यांनी देवस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यांचा उपस्थितांना परिचय करून देत मातृगौरव पुरस्काराची भूमिका आणि इतिहास विशद केला.
शाल,श्रीफळ, गौरव चिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान केल्यावर सद्गुरूंनी त्यात आपल्या जवळचे ४० हजार मिळवून जैताई देवस्थानलाच ९१ हजार रुपयाची देणगी प्रदान केली हे विशेष उल्लेखनीय.
निकम महाराज यांनी आपल्या मनोगतात परमपूज्य दादांच्या उपस्थितीमुळे हा केवळ गौरव समारंभ उरलेला नसून सत्संग झालेला आहे असे प्रतिपादन केले.

विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद पुंड यांनी श्रीपाद सेवा मंडळाच्या माध्यमातून चालणाऱ्या गोसेवा ते विद्यार्थी सुविधा अशा विविध भौतिक कार्यांच्या सोबत, वामनराज प्रकाशनाच्या द्वारे होत असलेल्या मानसिक तथा माऊली परिवाराच्या वतीने होत असलेल्या बौद्धिक, धार्मिक, आध्यात्मिक स्वरूपातील सामाजिक उन्नयनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करून पूज्य दादांच्या कार्याचा विविधांगी परामर्श घेतला.

जैताई मातेचा प्रसाद स्वरूपातील हा पुरस्कार आयुष्यातील एक अवर्णनीय आनंद आहे असे म्हणत सत्काराला उत्तर देताना सद्गुरु परमपूज्य शिरीष दादा कवडे यांनी जगदंबेच्या या विजयदुर्गा स्वरूपाचे वर्णन करीत देवीच्या आणि वणीच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेब शेवाळकरांनी या आडवळणाच्या गावाला साहित्याचे वळण लावले असे म्हणत त्यांनी वणीतील प्राचीन ज्ञान परंपरेला वंदन केले.

आपल्या मूळ आधारापासून तुटल्यामुळे आज माणूस निराधार होत आहे. जीवनाकडे पाहण्याची शुद्ध दृष्टी गमावून बसला आहे.भासमान दुःखाने ग्रस्त आहे. जीवनामध्ये झपाट्याने ऱ्हास पावत असलेली नीतिमत्ता,संस्कार ही खरोखरच अत्यंत काळजीची गोष्ट झाली आहे. असे प्रतिपादन करीत सात्विकतेचे अधिष्ठान देऊन व्यक्तीला सत्कार्य प्रवृत्त करणे हेच धर्माचे प्रथम स्वरूप आहे हे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन जैताई देवस्थानचे सचिव भागवत कथाकार मनुमहाराज तुगणायत यांनी केले. रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.




