Tuesday, September 8, 2026
Google search engine
spot_imgspot_img

वैद्यकीय व्यवसायाने दिला जीवनातील सर्वोच्च आनंद – डॉ. सुलभा मुंजे

सुमारे सात हजार बाळंतपणे करताना आलेले अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव

प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वैद्यकीय व्यवसाय हा केवळ एक व्यवसाय नसून तो एक आनंदाचा धर्म आहे. आपल्यासमोर आलेल्या समस्याग्रस्त रुग्णाला समस्या मुक्त होताना पाहणे आणि स्त्री वैद्य म्हणून असंख्य नवीन जीवांच्या जन्म घेताना एक माध्यम होणे हा जीवनातील महान आनंद वैद्यकशास्त्राने प्रदान केला असे विचार सुप्रसिद्ध स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. सुलभा मुंजे यांनी व्यक्त केले.


विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असणाऱ्या माझ गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण मालिकेत व्यक्ती तितक्या प्रकृती या विषयावर त्या व्यक्त होत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ दिलीप अलोणे उपस्थित होते.

प्रास्ताविकामध्ये डॉ दिलीप अलोणे यांनी या उपक्रमाची पार्श्वभूमी आणि इतिहासावर प्रकाश टाकत डॉ. सुलभा मुंजें सारखी व्यक्ती वणी मध्ये असण्याचा आनंद व्यक्त केला.
आपल्या प्रदीर्घकालीन अनुभवावर आधारित व्याख्यानामध्ये आजवर सुमारे सात हजार बाळंतपणे करताना आलेले अनेक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव त्यांनी कथन केले. अत्यंत अडचणीच्या शस्त्रक्रिया केल्यावर मिळालेल्या आनंदापासून पैसे न देता पळून गेलेल्या रुग्णांपर्यंतचे विविध अनुभव सांगत स्वतःच्या मृत्यूची पसरलेली खोटी बातमी आणि त्यानंतर भेटल्यावर सहकाऱ्यांनी आनंदाने मिठ्या मारत केलेले स्वागत हा हृद्य प्रसंग देखील श्रोत्यांना विशेष भावला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये गजानन कासावार यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेल्या कार्याचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ वणी चे सचिव डॉ अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक सोनटक्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावर यांनी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular