तालुक्यातील कोलेऱा(पिं) गावात शिरले नाल्याचे पाणी, अनेक घरे पाण्याखाली… वेकोली प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कोलेऱा ( पिंपरी) गावात पाणी शिरले असून सात ते आठ घरे बाधित झाली आहे. तर पाण्याने संपुर्ण गावाला वेढा घातला आहे.
वेकोली प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गावकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून वीज अन्न आणि पिण्याचे पाणी सुद्धा गावकऱ्यांना उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून गावात कोणाच्याच घरी चूल पेटणार नाही आणि सर्वाना उपाशी राहावे लागणार आहे. त्यामुळे वेकोली प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

गावाजवळून जाणारा नैसर्गिक नाला वे.को.ली.ने बंद केला आहे. गावाशेजारीच वे को ली ने मातीची मोठी डंपिंग उभी केली आहे. त्यामुळे शेतातील, गावातील आणि वे को लीचे पाणी वे को ली ने नाल्याची दिशा बदलविल्याने संपूर्ण पाणी गावाजवळ जमा झाले आहे. काहींच्या घरात तर कमरेपर्यंत पाणी साचले आहे. अन्न, वस्त्र, निवारा पाण्याखाली आल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गावात विजेचे तार तुटलेले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी बुडाली आणि पाणी गावात साचल्याने रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी जबाबदार हे वे को ली प्रशासन असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

गावाचे पुनर्वसन तातडीने करण्याची मागणी
कोल्हेरा (पिंपरी) हे गाव समस्यांचा विळख्यात सापडले आहेत मात्र शासन, प्रशासन व मुख्य म्हणजे वेकोली प्रशासनाचे गावाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संबंधितांनी आमच्या गावाचे तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्या काजल जितेंद्र बोंडे यांनी केली आहे.

यावेळी गोवर्धन पिदुरकर, प्रविण मांडवकर , विशाल आसुटकर, देविदास वाघमारे, नितीन कुरेकर, बाबाराव आसुटकर, नंदू झट्टे ,अंबादास अतकर, प्रकाश झाडे, सुरज लोढे, नितीन बोंडे, बापूजी ढोके, यांच्यासह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




