बायो मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी… रक्त वाहिन्यांमध्ये गाठी रोखण्यासाठी लावले नॅनोकणांचे संशोधन….
प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

वाढते वय, कोलेस्टेरॉल तसेच इतर आजारांमुळे शरीरातील रक्त घट्ट होऊन रक्त वाहिन्यांमध्ये गाठी (थ्रोम्बोसिस) तयार होतात. रक्तप्रवाहात अडथळा येऊन हृदयघात, ब्रेन हेमरेज, लकवा होऊ शकतो. रक्त पातळ करण्यासाठी अनेक महागड्या औषधे बाजारात उपलब्ध आहेत. आणि त्या औषधाचे शरीरावर साइड इफेक्ट सुद्धा होण्याची शक्यात असते. मात्र वणी सारख्या लहान तालुक्यातून शिक्षण घेणाऱ्या मुलीने केलेल्या संशोधनामुळे येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत वास्तव्यास मंगेश येनूरकर यांची कन्या देवयानी येनुरकर हिने IIT (BHU) काशी हिंदु विद्यापीठ येथे पोटॅशियम फेरीक ऑक्सलेट नॅनोकणांचे संशोधन यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

संशोधन पथकाचे डॉ. सुदीप मुखर्जी यांचे नेतृत्वात देवयानी हिने हा शोध लावला आहे. सध्या हा संशोधन प्राथमिक स्तरावर असून मानव प्रजातीवर परीक्षण, पेटंट, आणि उत्पादन प्रक्रियेनंतर बाजारात उपलब्ध होणार आहे. हे संशोधन थ्रोम्बोसिस म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होणाऱ्या गंभीर आजारावर उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदे मध्ये देण्यात आली.

देवयानी येनुरकर हिची उल्लेखनीय कामगिरी व वणी शहराचा नाव जागतिक स्तरावर उंचावल्याबद्दल संताजी ज्ञान प्रसारक मंडळ, वणीच्या वतीने तिचे कौतुक व सन्मान करण्यात आला. यावेळी देवयानी हिचे वडील मंगेश येनूरकर, आई गौरी येनुरकर सह धनंजय आंबटकर, तानाजी पाऊनकर, ओमप्रकाश निमकर, संजय पोटदुखे, दिलीप पडोळे, विवेक बुटले, शैलेश आडपावार व पत्रकार उपस्थित होते.




