प्रतिनिधी : आकाश दुबे, वणी

शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांना वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात अत्यंत मानाचा डॉ. शांतीस्वरूप भटनागर तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वणी नगरीतून पुणे येथे स्थायिक झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वणी पुणे लिंक असोसिएशनच्या द्वारे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक अरविंद कारखानीस यांच्या मार्गदर्शनात २९ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात हृद्य कौटुंबिक स्वरूपात सपत्निक सत्कार करण्यात आला.

आपल्या एका सहकाऱ्याला भारताच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे २२ ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या या अभिनव गौरवाचा आनंद करण्यासाठी आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाभा अनुसंधान केंद्राचे ज्येष्ठ वैज्ञानिक तथा सेवानिवृत्त संचालक डॉ. कृष्णा सैनिस यांनी भूषविले तर याप्रसंगी लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे प्रतिनिधी स्वरूपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे हे विशेषत्वाने उपस्थित होते.

हवेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या आणि संपूर्ण निसर्गालाच अत्यंत धोकादायक असलेल्या कर्बाम्ल वायूचे सोन्याच्या नॅनो मटेरियल च्या द्वारे मिथेन मध्ये रूपांतर करण्याच्या या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि उपयोगी संशोधनाबद्दल डॉ. विवेक पोलशेट्टीवार यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. कृष्णा सैनीस आणि प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला.
अशा कार्यक्रमांमुळे नवीन पिढीला प्रेरणा प्राप्त होईल आणि आपण देखील अशा स्वरूपातील काहीतरी भव्य दिव्य करावे अशी स्फूर्ती त्यांच्या मनात जागृत होईल असा आशावाद प्रा. अरविंद कारखानीस यांनी व्यक्त केला.
प्रांजली कोंडावार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा पसायदान सादर केले. तर आभार प्रदर्शन रवी सरपटवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश मैलारपवार, प्रशांत झाडे, अरविंद पारखी, सुभाष लोडे, प्रवीण भोयर यांनी विशेष परिश्रम घेतले.





